Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात कमाल तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर*


 15-May-23

पुणे : उन्हाची ताप वाढल्याने चटका तापदायक ठरत आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा हंगामातील उच्चांकी पातळीवर पोचला आहे. तापमानाचा पारा ४५ अंशापार गेल्याने अकोला, जळगावमध्ये उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. १५) उन्हाची ताप टिकून राहणार असून, कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उन्हाच्या झळांनी पिके, ऊस, फळबागा करपू लागल्या आहेत. उकाड्यातही वाढ झाल्याने अंगाची लाही लाही होत असून उष्माघातामुळे जिवीतहानी वाढण्याचे शक्यता आहे. रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. जळगाव येथे पारा ४५ अंशाच्या पुढे गेल्याने तेथे उष्णतेची लाट आली आहे. तर परभणी, अमरावती, वर्धा येथे तापमान ४४ अशांच्या पुढे गेले आहे. तसेच धुळे, सोलापूर, नांदेड, यवतमाळमध्ये पारा ४३ अंशांच्या वर आहे. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे.

दक्षिण हरियाणामध्ये समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत तर पूर्व उत्तर प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. आज (ता. १५) राज्यात कमाल तापमानातील चढ-उतार होण्याबरोबरच, दमट आणि उष्ण हवामान अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

🌡रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३८.० (२३.२), जळगाव ४५.० (२६.०), धुळे ४३.४ (-), कोल्हापूर ३५.१ (२४.०), महाबळेश्वर ३१.९ (१८.६), नाशिक ३८.६ (२३.७), निफाड ४२.० (२३.८), सांगली ३७.६ (२३.६), सातारा ३७.८ (२३.१), सोलापूर ४३.३ (२५.०), सांताक्रूझ ३४.५ (२७.६), डहाणू ३६.७ (२६.५), रत्नागिरी ३४.० (२६.२), छत्रपती संभाजीनगर ३४.५ (२७.६), नांदेड ४३.२ (२६.२), परभणी ४४.७ (२६.०), अकोला ४५.६ (२८.६), अमरावती ४४.६(२४.१), बुलढाणा ४१.२ (२८.२), ब्रह्मपूरी ४१.४ (२४.६), चंद्रपूर ४२.४(२३.०), गडचिरोली ४१.६(२४.६), गोंदिया ४१.६ (२१.४), नागपूर ४२.७ (२३.२), वर्धा ४४.१(२५.९), यवतमाळ ४३.० (२४.०)

*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*

https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en 

🌀'मोचा' चक्रीवादळ किनाऱ्याला धडकले : बंगालच्या उपसागरातील 'मोचा' अतितीव्र चक्रीवादळ रविवारी (ता. १४) दुपारी उत्तर म्यानमार आणि दक्षिण बांग्लादेशच्या किनाऱ्यादरम्यान असलेल्या सिट्वेजवळ (म्यानमार) किनाऱ्याला धडकले. चक्रीवादळाच्या प्रवाहामुळे किनाऱ्याजवळ ताशी १८० ते २१० किलोमीटर वेगाने वारे वाहून, जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. वादळामुळे ईशान्य भारतातील राज्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. आज (ता. १५) पहाटेपर्यंत वादळ निवळून जाण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments