वाशिम - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मधील दोन कर्तृत्ववान महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणा महिला व बालकल्याण विभागाने केली आहे. अर्ज पाठविण्याची अंतीम मुदत २० मे अशी आहे.
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये चांगले काम करणार्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्धेशाने ही पुरस्कार योजना राबविण्यात येणार आहे. यंदा ३१ मे रोजी आलेल्या होळकर जयंतीला या पुरस्कारांचे गावपातळीवर वितरण होणार आहे. दरवर्षी जयंतीदिनी हे पुरस्कार वितरित करण्याचे निर्देश महिला, बाल विकास विभागाने दिले आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, ५०० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यासाठी इच्छुक महिला ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवासी असणे व महिला- बालविकास क्षेत्रात त्यांची किमान ३ वर्षे उल्लेखनीय कामगिरी करीत असणे आवश्यक आहे. बाल विवाह, हुंडा निर्मूलन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला बचत गट, आरोग्य साक्षरता, मुलींचे शिक्षण या क्षेत्रात त्यांचा पुढाकार आवश्यक आहे. या महिलांची निवड सरपंचाच्या अध्यक्षतेखालील निवड समिती करणार आहे. त्यामध्ये ग्रामसेवक, पोलीस पाटील, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा समावेश राहणार आहे. कार्यकाळ संपलेल्या ग्राम पंचायतमध्ये प्रशासक हे समितीचे अध्यक्ष राहतील, असे स्पष्ट करण्यात आले. इच्छुक महिलांना आपला प्रस्ताव ग्रामपंचायतकडे स्वतः सादर करावयाचा आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत क्षेत्रात उल्लेखनिय सामाजीक कार्य करणार्या कर्तृत्ववान महिलांनी आपल्या कार्य अहवालासह आपल्या क्षेत्रातील स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात स्वत: अर्ज सादर करण्याचे आवाहन नर्सेस असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. माया रमेश वाठोरे यांनी केले आहे.
0 Comments