समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. हल्ली राज्यामधील तापलेले वातावरण पाहता काही समाजकंटक सोशल मिडिया माध्यमांचा दुरुपयोग करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांनी सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक झाले आहे.
अश्याप्रकरणी कलम १५३(अ), २९५(अ) भादंवि अन्वये कडक कायदेशीर कारवाई केली जाते. वाशिम जिल्हा घटकात सोशल मिडियाचा दुरूपयोग करून आक्षेपार्ह पोस्ट/लेख प्रसारित करून जातीय तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांविरोधात कलम १५३ (अ) व २९५(अ) भादंवि अन्वये ०९ गुन्हे दाखल असून त्यामध्ये एकूण १३ आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामाजिक स्वास्थ्य बिघडवू पाहणाऱ्या समाजकंटकांवर वाशिम जिल्हा पोलीस दलाचे सायबर सेल लक्ष ठेवून आहे.
_‘नागरिकांनी सोशल मिडीयाचा वापर समाजाच्या हितासाठी सामाजिक एकोपा, बंधुभाव कायम राहावा यासाठी करावा. अलीकडच्या काळातील काही घटना पाहता नागरिकांनी सोशल मिडीयाचा वापर एक जबाबदार नागरीक या नात्याने समाजहितासाठी करावा. सोशल मिडीयाच्या गैरवापरामुळे सामाजिक शांतता बिघडत असून अश्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी त्यांना आलेल्या भडकाऊ संदेशावर/अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये व तसे संदेश पुढे फॉरवर्ड करू नये.’_ असे आवाहन मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी जनतेस केले आहे
0 Comments