*मालेगाव प्रतिनीधी :-* सुरज अवचार 


जउळका रेल्वे नजिक असलेल्या औरंगाबाद नागपूर सुपर हायवेवरील काटेपूर्णा नदीवरील पुलावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे व नादुरुस्त कठड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून हा पूल अपघातास निमंत्रण देत आहे. या पुलाची दयनीय अवस्था झाल्यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे.


पहिल्याच पावसात पुलावर मोठमोठे खड्डे पडले व त्यामधील गज बाहेर उघडे पडले आहेत. पाण्याने खड्डे भरल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना रस्ता शोधावा लागत आहे. वाहन चालकांना गाडी चालवताना खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज नसल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पुलावरून जड वाहन किंवा ट्रॅव्हल्स गेली की पूल हादरतो. तसेच या पुलावर अनेक अपघात या अगोदर सुद्धा खड्ड्यामुळे झाले आहेत. याच पुलावरून ट्रक पाण्यात पडला होता. तेव्हा चार ते पाच दिवस लहान मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी लागले होते. काटेपूर्णा नदीवर लघुसिंचन विभागाचे चार प्रकल्प सुद्धा आहेत.शेतकऱ्यांच्या सिंचन क्षेत्राच्या दृष्टीने या पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता असताना सुद्धा लोकप्रतिनिधीचे याकडे चक्क दुर्लक्ष दिसून येत आहे. या प्रकल्पाच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे. पाण्याच्या पातळी सह पुलाची उंची वाढविण्याबाबत सर्वेक्षण सुद्धा झाल्याचे समजते. पुलाची उंची वाढवण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी व राजकीय पुढाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून बळीराजाचे सिंचन क्षेत्र अजूनही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ह्या पुलाचे काम करण्याची आवश्यकता असून हा पूल रस्तेविकास महामंडळाकडे असून सुद्धा हे काम लघुसिंचन विभाग करेल, असा वाद आहे. जऊळका रेल्वे येथील काटेपूर्णा नदीवरील पूल १९८४ मध्ये वाहुन गेला होता. काटेपूर्णा नदीवरील पुलावर पडलेल्या खड्यामुळे अनेकवेळा अपघात घडले असून या अपघातामुळे अनेकांना अपंगत्व आले, तर अनेकांचा बळी गेला. या पुलावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून यापुढे तरी या घटना घडू नयेत म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी व या पुलाचे काम मार्गी लावून पुर्ण करावे. अन्यथा या पुलावर झालेल्या अपघातंना संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.