वाशिम जिल्हा पोलीस दलातील पदोत्रतीस पात्र असलेल्या ६७ पोलीस अंमलदारांच्या पदोन्नतीचे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी दिले. या आदेशांन्वये १२ पोलीस हवालदार यांना पोलीस हवालदार पदावरून सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नत करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे ५५ अंमलदारांना पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नत करण्यात आले आहे.


मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी वाशीम जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्या पासून त्यांनी पोलीस अंमलदार यांना विहित वेळेत पदोन्नती व त्याचा लाभ मिळावा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि. २६.०८.२०२३ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात सर्व पदोन्नती प्राप्त पोलीस अंमलदारांच्या पदोन्नती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अंमलदारांना त्यांचे कुटुंबीय व मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांचे हस्ते पदोन्नती स्टार, फीत, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार यांनी या प्रसंगी बोलताना अशा प्रकारचे पदोन्नती सोहळ्याचे आयोजन करून त्यात कुटुंबियांना आमंत्रित करण्याचा नवीन पायंडा मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी घातला त्यामुळे दैनंदिन कर्तव्य पार पडण्यासाठी नवीन उर्जा प्राप्त झाली असे मनोगत व्यक्त केले. सर्वांनी वेळेवर विनाविलंब पदोन्नती मिळाल्या बाबत मा. पोलीस अधीक्षकांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षकांनी अंमलदार व त्यांचे कुटुंबीयासोबत संवाद साधत अंमलदार व त्यांचे कुटुंबियांस आरोग्य, पोलीस कल्याण योजना, शैक्षणिक व कौटुंबिक बाबींची आस्थेने विचारपूस केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे यांनी मार्गदर्शन व आभार व्यक्त करतांना पदोन्नती सह आपल्या कर्तव्यात जबाबदारी सुद्धा वाढते याची जाणीव करून दिल्याचे प्रतिपादन करून पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कल्याणासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव तत्पर आहे हि बाब मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी कृतीतून दाखवून दिल्याचे सांगितले.


सदर पदोन्नती सोहळा मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा आरज, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक किरिथीका सी ..एम., परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक अमर मोहिते प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (गृह) प्रदीप परदेशी पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक संजय चौधरी कल्याण शाखा, राखीव पोलीस निरीक्षक मांगीलाल पवार, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कुटुंबियांचे उपस्थितीत पार पडला.