वा
शिम : जिल्ह्यामध्ये सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात असल्याने येथे सिंचनाच्या पुरेशा सुविधा निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रकल्प कामांना गती देणे व नवीन प्रकल्पाची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यामुळे वाशिम येथील वाशिम पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय हे शेगाव जिल्हा बुलढाणा येथे स्थलांतरित करू नये अशी मागणी खा. भावनाताई गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे केली आहे.
खासदार भावनाताई गवळी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वाशिम जिल्ह्यातील मानोरा, मंगरूळपीर, वाशिम व मालेगाव तालुक्याचा मानव विकास निर्देशांक कमी आहे. तसेच देशातील 125 मागासलेल्या जिल्ह्याच्या कक्षेत वाशिम जिल्हा येतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीत वाशिम जिल्ह्याचा समावेश केला आहे. आकांक्षीत जिल्ह्याचा विकास हवा यासाठी केंद्र व राज्य सरकारने धोरण निश्चित केल्या त्यानुसार गेल्या चार-पाच वर्षापासून वाशिम जिल्ह्यात शेती, सिंचन,उद्योग,शिक्षण, आरोग्य यासह विविध क्षेत्रांमध्ये विविध विकासात्मक कामे होत आहेत.
वाशिम जिल्हा हा तापी व गोदावरी खोऱ्याच्या द्विभाजक रेषेवर येत असल्याने येथे सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात आहे. वाशिम पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय वाशिम अंतर्गत जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर,कारंजा व मानोरा तालुक्यात प्रकल्पाची विविध कामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी नव्याने प्रकल्प निर्माण करण्याची गरज आहे. म्हणून वाशिम पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय वाशिम हे जिगाव प्रकल्प पाटबंधारे मंडळ शेगाव मध्ये स्थलांतरित करू नये अशी मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी केली आहे. सदर कार्यालयाचे स्थलांतर झाल्यास वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पाच्या कामावर मोठा परिणाम पडू शकतो. त्याचप्रमाणे वाशिम ते शेगाव हे अंतर जास्त असल्याने येथील शेतकऱ्यांना सदर कार्यालयाशी संपर्क करणे अत्यंत अडचणीचे जाणार आहे. म्हणून वाशिम पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय वाशिम या कार्यालयाचे स्थलांतर करणे हे आकांक्षीत जिल्ह्यावर अन्यायकारक ठरेल असे देखील खा. भावनाताई गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व जलसंपदामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
0 Comments