Ticker

6/recent/ticker-posts

*जलजीवन मिशन योजनेच्या कामांची सखोल चौकशी करा मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांची सीईओंकडे निवेदनाद्वारे मागणी*

 


वाशिम - ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत होत असलेल्या जलजीवन मिशन योजनेमध्ये कमालीची अनियमीतता होत असल्याने, या योजनेच्या सर्वच कामांची सखोल चौकशी करावी. तसेच संबंधीत दोषी असलेल्या कार्यकारी अभियंता, उपअभियंता, अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी आज (दि. १) जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत अनेक ठिकाणी जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर करण्याचे सरकारचे धोरण होते. मात्र, ही योजना वाशिम जिल्ह्यात संथगतिने सुरू असून, अर्धवट काम केल्यानंतरही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून धावत्या देयकांच्या नावाखाली कंत्राटदारांना लाखो रुपयांचे देयके अदा करण्यात आली आहेत. सदर कंत्राटदारांनी ही कामे जर पूर्ण केली नाहीत तर, याला जबाबदार कोण? यावर कार्यकारी अभियंता यांची वागणूक उद्धटपणाची व एकतर्फी असल्याने या सर्व प्रकारामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्याकारी अभियंता, उपअभियंता व अभियंता यांचा सहभाग असून, कंत्राटदाराशी संगनमत करून शासनाच्या पैशाचा गैरवापर केल्या जात आहे. या योजनेपोटी शासनाच्या पैशाचा गैरवापर होत असल्याने या पैशाचा गैरवापर टाळण्यासाठी आपण एक जबाबदार अधिकारी म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत आजपर्यंत अदा करण्यात आलेल्या देयकांचे त्रयस्त समितीकडून फेरमुल्यांकण करून संबंधित दोषींवर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी राजू पाटील किडसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा मनसेच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, मंगरुळनाथ मनसे तालुकाध्यक्ष लक्ष्मण घोडे, रस्ते साधन-सुविधा जिल्हाध्यक्ष निखील चव्हाण,  विद्यार्थी सेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शुभम घोडे, संतोष इंगोले, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष प्रवीण घोडे यांच्यासह मोठ्यासंख्येने मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

.....

योजनेमध्येही अनेक त्रुट्या...

योजना पूर्ण करण्याचा कालावधी हा १८ महिन्यांचा आहे. त्यामधील १३ ते १४ महिने आजरोजी पूर्ण झाले आहेत. अनेक कामांचे अजूनही भूमिपूजन सुद्धा झाले नाही. तसेच काही योजनेमध्ये लघु पाटबंधारे विभागाकडून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले नाही. अशा अनेक त्रुट्या या योजनेमध्ये आढळून येत असल्याच्या बाबी या निवेदनाद्वारे नमूद केले आहे. 

......

जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सावळा गोंधळ सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या सर्वच कामांची सखोल चौकशी करून, शासनाच्या पैशाचा होणारा दुरुपयोग थांबवावा. तसेच दोषी अधिकारी, कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा मनसेच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडू.


-राजू पाटील किडसे, मनसे जिल्हाध्यक्ष, वाशिम 

.....

Post a Comment

0 Comments