Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभा निवडणूक प्रशिक्षणाला अधिकारी, कर्मचाऱ्यांची दांडी रिसोड येथील प्रकार: कारणे दाखवा नोटीस बजावणार


रिसोड : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी तथा रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ३३- रिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणाला काही मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी दांडी मारली. या सर्वांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.

उपविभागीय अधिकारी तथा रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना निवडणूकविषयक कायदेशीर तरतुदींची माहिती दिली. त्यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना निवडणूक संबंधित कायदे, नियम व पद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली. हे प्रशिक्षण सकाळ आणि दुपार, अशा दोन सत्रांत घेण्यात आले. या प्रशिक्षणास सर्व महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रिसोडच्या तहसीलदार वैशाली तेजनकर, मालेगावचे तहसीलदार दीपक पुंडे, मालेगावचे नायब तहसीलदार सुनील देशमुख, मालेगाव तहसीलचे लिपिक गजानन देशमुख, रिसोडच्या नायब तहसीलदार विद्या जगाडे, तसेच लिपिक संदीप काळबांडे उपस्थित होते. प्रशिक्षणाला सकाळच्या सत्रात ४१२ पैकी ३९१ उपस्थित होते, तर २१ अनुपस्थित होते. शिवाय ४१२ एफपीओंपैकी ३९३ उपस्थित, तर १९ अनुपस्थित होते. दुपारच्या सत्रात ८९३ ओपीओंपैकी ८३२ उपस्थित. तर १९ अनपस्थित होते.



व्हीव्हीपॅट, ईव्हीएमची विस्तृत माहिती


लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे या यंत्रांची निवडणूकविषयक सर्व बाबींची त्यांनी प्रत्येकाला विस्तृत माहिती दिली.


या प्रशिक्षण कार्यशाळेला ऑब्झर्व्हर म्हणून अपूर्वा बासूर (भाप्रसे) या होत्या. या प्रशिक्षणादरम्यान जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनीही मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments