वाशिम - जि.प. लघुसिंचन विभागाच्या वतीने मंगरुळपीर तालुक्यातील लाठी येथील अडाण नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधार्याच्या लिकेज गेटमुळे बंधार्यात पाणी साठवणूक झाली नाही. त्यामुळे सिंचनाअभावी शेतकर्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्व कोल्हापुरी बंधार्याची व छोट्या प्लगची चौकशी करुन त्याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत बुधवार, ३० एप्रिल रोजी वंचितचे जिल्हासचिव विनोद भगत यांच्यावतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जि.प. सिईओंना निवेदन देण्यात आले
निवेदनात नमूद आहे की, मंगरुळपीर तालुक्यातील लाठी येथील अडाण नदीवर जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्या वतीने १ कोटी रुपये किंमतीच्या कोल्हापुरी बंधार्यास ८ ऑगष्ट २०१८ रोजी प्रशासकीय मंजुरात देण्यात आली होती. त्यानंतर २८ मे २०१८ रोजी सदर कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. हा बंधारा २०२२-२३ मध्ये बांधुन पुर्ण झाला होता. वर्ष २०२३-२४ मध्ये बंधार्यातील पाणी अडविण्यासाठी त्यावर लोखंडी गेट बसविण्यात आले. मात्र हे गेट लिकेज असल्यामुळे या बंधार्यामध्ये आजतागायत पाण्याची साठवणूक झाली नाही. त्यामुळे आजपर्यत या बंधार्यातुन १ हेक्टर सुध्दा सिंचन करता आले नाही. आजरोजी लाठी गावात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. या बंधार्यातील गेटचे लिकेज त्वरीत दुरुस्त केले तर ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. तसेच या साठवण बंधार्यामुळे लाठी व चिखली शिवारातील ७९.९९ हेेक्टर शेतील सिंचनाचा लाभ मिळेल. शिवाय गावातील विहीरीच्या पाण्याची पातळी वाढून परिसरातील कास्तकारांचे राहणीमान उंचावण्यास मदत होईल. त्यामुळे लाठी येथील कोल्हापुरी बंधार्यासह जिल्हयातील सर्व कोल्हापुरी बंधार्याची व छोट्या प्लगची चौकशी करुन त्याची श्वेतपत्रिका काढून शेतकर्यांना न्याय द्यावा अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
0 Comments