Ticker

6/recent/ticker-posts

*गट ग्रामपंचायत पाचांबा गणेशपुर येथे अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार वितरण* *डॉ. माया वाठोरे व सौ. छाया भोपळे यांची निवड : सेवानिवृत्त शिक्षक व तलाठी यांचा सत्कार*


वाशिम - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिसोड तालुक्यातील गट ग्रामपंचायत पाचांबा गणेशपुर येथे शासनाच्या दिशानिर्देशानुसार बुधवार, ३१ मे रोजी आयोजीत कार्यक्रमात दोन कर्तृत्ववान महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच सेवानिवृत्त शिक्षक व तलाठी यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

  महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या गावातील २ महिलांना अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्याचे निर्देश महिला व बालविकास विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला दिले होते. त्यानुसार या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शोभा विजय जाधव तर प्रमुख पाहूणे म्हणून ग्रामविकास अधिकारी आर.एस. गरकळ, सरपंच प्रतिनिधी विष्णू जाधव, उपसरपंचपती किशोर हिवाळे, ग्रा.पं. सदस्य विठ्ठल इढोळे, गुंफाबाई शेेगर, प्रताप ताकतोडे, विजय मुटकुळे, डॉ. माधव हिवाळे, अंगणवाडी सेविका गिताबाई ताकतोडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर सामाजीक क्षेत्रासह महिला व बालविकासाच्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या डॉ. माया रमेश वाठोरे व बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास साधणार्‍या सौ. छाया रविकुमार भोपळे यांना सरपंच सौ. शोभा जाधव यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारस्वरुप सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. 

  कार्यक्रमाचे औचित्य साधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले शिक्षक अजाबराव सरनाईक व तलाठी रविचंद शिंदे यांचाही ग्रामविकास अधिकारी आर.एस. गरकळ यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या पुरस्कारामुळे महिलांसाठी काम करणार्‍या महिलांचे मनोबल उंचावले असून इतर महिलांना प्रेरणा मिळाली असून शासनाच्या वतीने महिलांच्या कार्याची खर्‍या अर्थाने दखल घेतल्या गेल्याचे मत सरपंच सौ. शोभा जाधव यांनी व्यक्त केले. शासनाचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून ग्रामीण भागातील उपेक्षीत महिलांच्या विकासाची पहाट उगवली असल्याचे ग्रामविकास अधिकारी गरकळ म्हणाले. तर डॉ. माधव हिवाळे म्हणाले की, महिला ह्या शक्तीचे रुप असून महिला ही आपल्या सद्सद्विवेक बुध्दीने परिवाराला एका सुत्रात बांधुन ठेवते. त्या कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हे महिलांनी आपल्या कर्तबगारीने सिध्द करुन दाखविले आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेत असून पुरुषांपेक्षाही जास्त क्षमतेने कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल शासनाने घेवून अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी कर्तबगार महिलांच्या केलेल्या सत्कारामुळे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला सोनेरी झळाळी प्राप्त झाली आहे असे हिवाळे म्हणाले. कार्यक्रमाला गावातील अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, मदतनिस, आशासेविका यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments