हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गरजले होते!
"तालुका खोडा अन लिहा जिल्हा"!
वाशीम जिल्ह्याचे शिल्पकार लोकनेते स्व.खा.पुंडलिकभाऊ गवळी यांचा हट्ट आणि पाठपुरावा!
जाहीर कार्यक्रमात पदरात टाकला वाशीम जिल्हा!
पंचवीस वर्षानंतरहि जाग्या आहेत स्मृती!
आज १ जुलै २०२३ वाशीम जिल्हा निर्मितीचा पंचविसावा वर्धापनदिन मात्र शासन प्रशासन लोकप्रतिनिधी आणि जनताही उदासीन !
बरोबर पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे १ जुलै १९९८ ला वाशीम जिल्ह्याची निर्मिती झाली. आणि अनेकांचे अनेक वर्षाचे स्वप्न साकार झाले.
मला अजूनही आठवते.१९९७ ला हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे देगाव येथे आदरणीय पुंडलिकभाऊ गवळी यांच्या खास खास आग्रहास्तव कारखान्याच्या उद्घाटनासाठी आले होते.
न भूतो न भविष्यति अशी हि सभा. अतिशयोक्ती वाटेल पण गाड्यांच्या रांगा इकडे रिसोड पर्यंत आणि तिकडे मालेगाव पर्यंत अशी ती प्रचंड सभा.
या सभेत हिंदू नृसिंह बाळासाहेबांनी सिंहगर्जना ठोकली.
"तालुका खोडा आणि लिहा जिल्हा आजपासून.
जिल्ह्यात सर्वत्र उत्साह,जल्लोश.
खरं सांगु ! या घोषणेमागची मेहनत विसरताच येणार नाही. अपार कष्ट, मेहनत, तगादा, उठता बसता पु.बाळासाहेबांच्या आणि मुख्यमंत्री श्री. मनोहरजी जोशी सर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या मागे टुमणे लावून लावून त्यांना अक्षरशः भाग पाडले ते स्व. खा. पुंडलिकभाऊ गवळी यांनी. एकदा तर मुख्यमंत्री जोशी सरांना ते म्हटले की माझा जिल्हा द्या नाहीतर तुमच्या वर्षा बंगल्यासमोर उपोषण करीन .अशी भीष्मप्रतिज्ञाच सर्वांसमोर स्व. पुंडलिक भाऊ गवळी यांनी केली. मुख्यमंत्री जोशी सरांच्या एका सभेचे सूत्रसंचालन मी केले होते. त्यावेळी सरांनी याबाबत वाच्यता केल्याचे मला आठवते.
स्व.पुंडलिकभाऊंचा प्रचंड आग्रह आणि हट्ट लक्षात घेवून आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी मुद्दाम देगावच्या अतिप्रचंड सभेत विशाल जनसमुदायासमोर पुंडलिकभाऊंच्या पदरात अक्षरशः जिल्हा टाकला.
त्यानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर १ जुलै १९९८ ला जिल्ह्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
खरंतर जिल्हा निर्मिती हां सोपा विषय नाही. राज्याचा अर्थ संकल्पच बदलतो.पण यांच्या आग्रहाखातर वाशीम सोबतच हिंगोली, नंदुरबार जिल्हे झालेत. त्याही जिल्ह्याचे श्रेय एका अर्थांनी आपल्याच जिल्ह्याच्या नेत्याला.
त्यापूर्वी वाशीम जिल्ह्यातल्या अनेकांनी संघर्ष केला, आंदोलने ही केली. अँड. शामराव उंडाळ यांच्यासारख्या अनेकांनी संघर्ष केला.
त्या सर्व ज्ञातअज्ञात महानुभावांच्या प्रती कृतज्ञता भाव आहेच.
पण स्व.खा.पुंडलिकभाऊ गवळी यांचा संघर्ष अनोखाच.
एकदा तर ते मुंबई ते दिल्ली केवळ मुख्यमंत्री त्या विमानातून चालले म्हणुन त्या विमानात फक्त हाच विषय घेवून दिल्लीपर्यंत गेले. सामान्य भाषेत सांगायचे तर त्यांनी श्री.मनोहर जोशी सरांचे अक्षरशः डोके खाल्ले.
पाठपुराव्यासाठि दर आठवड्यात केबिनेटच्या दिवशी मुंबई. स्व. बाळासाहेबांची भेट, सचीवालयात ठिय्या.थोडक्यात जिल्हानिर्मितिच्या ध्येयाने वेडे होऊन स्व. पुंडलिक भाऊ यांनी जिवतोड प्रयत्न केलेत.
त्यांनी जिल्हा तर निर्माण केला पण जिल्ह्याचा विकास हि आपली सर्वांची जबाबदारी.
इथे उद्योगधंदे येवून भूमिपुत्रांना नोकऱ्या हव्यात. इथल्या एम.आई.डी.सी.सुसज्ज हव्यात. सर्व प्रकारची कार्यालये इथे यावीत. विद्यापीठाचे उपकेंद्र, रेल्वे कार्यालये, कृषी विद्यापीठ उपकेंद्र ,दळणवळणाच्या सोयीसुविधा, वैद्यकीय महाविद्यालय, सिंचन कार्यालये अशा सर्वच सोइसवलती इथे आल्या पाहिजेत.
याबाबत जिल्हा मात्र अजूनही उदासीन दिसतो.
जी आक्रमकता, चिकाटी, जिद्द आणि प्रश्न धसास लावण्याची हातोटी स्व.पुंडलिक भाऊ यांच्या मध्ये होती ती जिद्द सर्वच लोकप्रतिनिधींनी अंगिकारुन जिल्हा विकासाच्या दिशेने वेगात पुढे न्यावा हि सर्वांची अपेक्षा आहे.
आपण सर्वांनी जिल्हाविकासकामात पक्षभेद विसरून त्यांना सहकार्य करू. जिल्हा जर कृषी, उद्योग, शिक्षण आरोग्य अशा क्षेत्रात भरारी घेईल तरच जिल्ह्याच्या शिल्पकारांना समाधान मिळणार आहे. त्यासाठी आपण एकमेका साह्य करू.
वाशीम जिल्हा वर्धापनदिनाच्या सर्व जिल्हावासियांना मनातून शुभेच्छा.
वाशीम जिल्ह्याचे शिल्पकार स्व. पुंडलिकभाऊ गवळी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
प्रा. दिलीप जोशी वाशीम. 9822262735
0 Comments